
इस्लामाबाद, 04 एप्रिल (हिं.स.)। पाकिस्तानच्या अस्थिर प्रांत बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याच्या मागणीसाठी सक्रिय असलेल्या सशस्त्र बंडखोर संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए)ने पाकिस्तानी सुरक्षा दलांचे 86 जवान ठार केल्याचा दावा केला आहे. बीएलएने म्हटले आहे की सैन्याचे अनेक रडार नष्ट करण्यात आले आहेत. लष्करी ताफे, हवाई तळ आणि ‘डेथ स्क्वॉड’वर हल्ले करून सुरक्षा दलांना माघार घेण्यास भाग पाडले आहे.
द बलुचिस्तान पोस्टच्या अहवालानुसार, बीएलएने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत एक्सवर एक व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ 14 मिनिटांचा आहे. या व्हिडिओमध्ये रडार प्रणालींचा विनाश, शम्सी एअरबेसवर रॉकेट हल्ला, झाल मगसीवरील हल्ले, सोराब आणि कुर्दगाप येथे लष्करी ताफ्यांवर हल्ले आणि कदन व मस्तुंग येथील लष्करी छावण्यांवरील हल्ले दाखवले आहेत. व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की बीएलएने दलबांदिन येथे खाण क्षेत्रावर नियंत्रण मिळवले आहे. पंजगुरमध्ये पाकिस्तान सरकारसमर्थित ‘डेथ स्क्वॉड’च्या मुख्यालयावर हल्ला करून त्यावर ताबा मिळवला आहे.
व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या सैन्याची वाहने, शस्त्रे आणि इतर लष्करी उपकरणे जाळताना दाखवण्यात आली आहेत. बीएलएचे प्रवक्ते जीयंद बलोच यांनी आज सविस्तर निवेदन जारी करून सांगितले की, लढवय्यांनी 29 मार्च रोजी अस्थिर बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सैन्याविरुद्ध समन्वित हल्ले सुरू केले. हे हल्ले 1 एप्रिलपर्यंत सुरू होते. पंजगुर, शापक, बसिमा, साबी, नसीराबाद, डेरा बुगती, मस्तंग, क्वेटा, नुश्की, ज़मरान, दश्त, सोराब, झाल मगसी, दलबंदिन, खारान, वाशक आणि कलात येथे एकूण 65 हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये 86 हून अधिक जवान ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत.
प्रवक्त्यांनी सांगितले की या हल्ल्यांमध्ये लष्करी छावण्यांसह हवाई तळ, रडार प्रणाली, संचार टॉवर्स, रेल्वे ट्रॅक, पूल आणि गॅस पाइपलाइन यांना लक्ष्य करण्यात आले. पंजगुर आणि ज़मरान येथे झालेल्या चकमकींमध्ये बीएलएचे सहा लढवय्ये ठार झाले.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
