
नागपूर, 04 एप्रिल (हिं.स.) – सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. बिनविरोध निवडणूक झाली तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी ही बाब ठरेल. यापूर्वीही अनेकदा बिनविरोध निवडणूक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपनेही पुढाकार घेतला होता. त्यामुळे बारामती येथे पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
फडणवीस पुढे म्हणाले की, बारामती पोटनिवडणूक बाबत असं वाटतं की, सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे, माझी अशी सर्वांना विनंती असेल. यापूर्वीही महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केल्या आहेत. मला आठवते की जेव्हा आर.आर. आबांच दु:खद निधन झालं होतं त्याही वेळेस ती पोटनिवडणूक भाजप आणि आम्ही ठरवलं होतं की लढणार नाही आणि त्यावेळी ती बिनविरोध केली होती. मला वाटतं सर्वच पक्षांनी मन मोठं करून निवडणूक बिनविरोध केली पाहिजे.
यापूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लावला होता. काल शुक्रवारी महायुती सरकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कॉंग्रेस नेत्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी मोठे मन करावे, असे आवाहन केले. काँग्रेस पक्षाने बारामतीसोबतच राहुरी या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. मात्र उपमुख्यमंत्रिपद भूषवताना राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यत्व घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्या बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येत्या ६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्यात बैठकांना सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावागावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी रणनीती आखली जात आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
