अमरावती :राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची मोहीम ९ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिवांनी यासंदर्भात अलीकडेच परिपत्रक काढले असून, २० फेब्रुवारीपूर्वी जे कर्मचारी याचा लाभ घेत होते, त्यांची शिधापत्रिका शुभ्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, एक लाखावर उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचे कार्ड यापुढे शुभ्र होणार आहे.
या घोषणेनुसार अन्न पुरवठा विभागाने मोहीम हाती घेतली आहे.१७ जुलै २०१३ रोजी शासनाच्या निर्णयानुसार, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा अंत्योदयमध्ये व दारिद्रयरेषेवरील (ग्रामीण भागात त्यांचे उत्पन्न ४४ हजार व शहरी भागात ५९ हजार असणाऱ्या) शिधापत्रिकाधारकांचा समावेश प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी गटात करण्याकरिता १७ डिसेंबर २०१३ला निर्णय झाला होता. त्याची पूर्तता सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाकडुन यासाठी आवाहन केले जात आहे.
