– तरीही तुरुंगाबाहेर येणार नाही
इस्लामाबाद , 21 ऑगस्ट (हिं.स.)। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सुप्रीम कोर्टाने गुरुवारी(दि.२१) मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने ९ मे २०२३ रोजीच्या हिंसाचाराशी संबंधित आठ प्रकरणांमध्ये त्यांना जामिन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर झाली, ज्याचे अध्यक्ष मुख्य न्यायाधीश अफरीदी होते आणि त्यांच्यासोबत न्यायमूर्ती शफी सिद्दीकी आणि न्यायमूर्ती मियांगुल औरंगजेब होते. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने इम्रान खान यांना जामिन मंजूर केला. खान यांच्यावतीने वकील सलमान सफदर यांनी बाजू मांडली, तर सरकारच्या बाजूने पंजाबचे विशेष सरकारी वकील जुल्फिकार नकवी उपस्थित होते.
इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयने या निर्णयाचे स्वागत करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्सवर #इमरान खानचा विजय हा हॅशटॅग वापरून आनंद व्यक्त केला. पक्षाचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते जुल्फिकार बुखारी यांनी म्हटले, “सुप्रीम कोर्टाने 9 मेच्या प्रकरणांमध्ये इम्रान खान यांना जामिन दिला आहे. आता केवळ अल-कादिर ट्रस्ट प्रकरणामध्ये जामिन मिळणं बाकी आहे. त्यानंतरच त्यांची सुटका होऊ शकते.” मात्र, बुखारी यांनी हे स्पष्ट केले की, या जामिनानंतरही खान यांची लगेच सुटका होणार नाही, कारण ते 190 मिलियन पाउंडच्या भ्रष्टाचाराशी संबंधित अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात शिक्षा भोगत आहेत.
72 वर्षीय इम्रान खान यांनी लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयात 9 मेच्या दंगलींसंबंधी (ज्यामध्ये लाहोर कोअर कमांडरच्या घरावर झालेला हल्लाही समाविष्ट आहे) जामिनासाठी अर्ज केला होता, जो नोव्हेंबर 2024 मध्ये फेटाळण्यात आला होता. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयाने 24 जून 2025 रोजीही त्यांची अपील फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
इम्रान खान यांना एप्रिल 2022 मध्ये पंतप्रधान पदावरून हटवण्यात आले होते, त्यानंतर ते अनेक न्यायप्रकरणांना सामोरे जात आहेत. 9 मे 2023 रोजी इम्रान खान यांना इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अनेक शहरांमध्ये हिंसाचार आणि तोडफोड केली होती. यानंतर इम्रान खान आणि त्यांच्या पक्ष पीटीआय मधील अनेक नेत्यांवर दंगल भडकवण्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. ऑगस्ट 2023 पासून ते रावळपिंडीमधील उच्च सुरक्षा असलेल्या आदियाला कारागृहात बंद आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
