– आ. दिगंबर कामत यांनाही मिळाली मंत्रीपदाची संधी- इच्छुकांच्या पदरी निराशा
पणजी, 21 ऑगस्ट (हिं.स.) – मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सामील होण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष रमेश तावडकर यांनी आज, गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी अध्यक्ष रमेश तावडकर आणि आमदार दिगंबर कामत यांनी दुपारी १२ वाजता राजभवन येथे मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शपथविधीनंतर विधानसभेत दाखल झालेले रमेश तावडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी विधानसभा अध्यक्ष म्हणून माझ्या कामावर समाधानी होतो आणि पूर्ण कार्यकाळ काम करण्याची माझी इच्छा होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करत मी मंत्रीपद स्वीकारले. विधानसभा अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मला कोणत्याही अडचणी आल्या नाहीत आणि सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील आमदारांनी, विशेषतः विरोधी पक्षनेत्यांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला, असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.
गेल्या वर्षभरापासून रखडलेला हा मंत्रीमंडळ विस्तार अखेर पूर्ण झाला. या फेरबदलामुळे प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आला होता. तसेच, आदल्या दिवशीच कायदा मंत्री अलेक्स सिक्वेरा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन जागांवर रमेश तावडकर आणि दिगंबर कामत यांना संधी मिळाली आहे. या विस्तारामुळे मंत्रीमंडळात स्थान मिळवण्यासाठी इच्छुक असलेले आमदार संकल्प आमोणकर (मडगाव) आणि मायकल लोबो (कळंगुट) यांचा मंत्रीमंडळातील प्रवेश तूर्तास लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात आणखी काही राजकीय घडामोडी घडतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
गोवा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर मार्च २०२२ मध्ये तावडकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली. २००७ मध्ये विधानसभेवर निवडून आलेले, त्यांनी यापूर्वी भाजप सरकारमध्ये क्रीडा, आदिवासी कल्याण आणि कृषी यासारख्या खात्यांसह मंत्री म्हणून काम केले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
