– संशयित वडील- मुलाला अटक
लंडन, 25 ऑगस्ट (हिं.स.)। लंडनमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत रेस्टॉरंटमध्ये जेवत असलेले पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणी पोलिसांनी रविवारी(दि.२४) संशयित पिता–पुत्राला अटक केली आहे.
मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना लंडनमधील इलफोर्ड परिसरात स्थित ‘इंडियन अरोमा’ नावाच्या एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी(दि.२२) रात्री घडली. या आगीत तीन महिला आणि दोन पुरुष जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणी पोलिसांनी रविवारी(दि.२४) संशयित पिता–पुत्राला अटक केली आहे. वडिलांचे वय सुमारे ५४ वर्षे तर मुलगा १५ वर्षांचा आहे. पोलिसांनी घटनेबाबत अधिक माहिती असल्यास नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेस्टॉरंटचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे.या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांनी आधी रेस्टॉरंटमध्ये ज्वलनशील पदार्थ सांडला. त्यावेळी अनेक ग्राहक जेवत होते. काही कळण्याआधीच त्यांनी आगीचा भडका उडवला आणि काही क्षणांतच संपूर्ण रेस्टॉरंट आगीच्या वेढ्यात आले. आग लागल्यानंतर लोकांनी भीतीने धावपळ केली आणि जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले.ही घटना केवळ धक्कादायकच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
