लंडन, 20 सप्टेंबर (हिं.स.) युरोपातील अनेक विमानतळांवर चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टीमला लक्ष्य करत सायबर हल्ले करण्यात आले. यामुळे शेकडो उड्डाणांना उशिर झाला. आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या तांत्रिक समस्येमुळे प्रमुख युरोपीय विमानतळांवर कडक सुरक्षा उपाय लागू करण्यात आले. अनेक विमानतळांनी मॅन्युअल प्रक्रिया वापरून उड्डाणे सुरू ठेवली होती. ब्रुसेल्स विमानतळ प्रशासनाने नोंदवले की, त्यांच्या चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टीम प्रदात्यावर शुक्रवारी रात्री सायबर हल्ला झाला. ज्यामुळे तांत्रिक प्रणालीमध्ये व्यत्यय आला. परिणामी विमानतळावर मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया लागू करण्यात आल्या. यामुळे उड्डाण वेळापत्रकात व्यत्यय आणि विलंब झाला. विमानतळ व्यवस्थापनाने प्रवाशांना संयम बाळगण्याचे आणि नियमितपणे त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. जर्मनीतील ब्रँडनबर्ग विमानतळावरही त्यांच्या सिस्टीमवर सायबर हल्ला झाल्याची माहिती आहे. परिणामी सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ प्रशासनाने त्यांचे नेटवर्क कनेक्शन तात्पुरते डिस्कनेक्ट केले. दरम्यान, लंडनच्या हीथ्रो विमानतळावरही तांत्रिक समस्या आहे. हीथ्रो विमानतळाच्या म्हणण्यानुसार अनेक विमान कंपन्यांना चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टीम प्रदान करणाऱ्या कॉलिन्स एरोस्पेसला तांत्रिक अडचणी येत आहेत.ज्यामुळे उड्डाणांना विलंब होत आहे. सर्व विमानतळांनी प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटची स्थिती वारंवार ऑनलाइन तपासण्याची आणि उड्डाणाच्या वेळेचा विचार करून त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याची विनंती केली आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल विमानतळ व्यवस्थापनाने माफी मागितली आहे. आणि समस्या सोडवण्यासाठी काम सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. —————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
