युएनने बोलावली आपत्कालीन बैठक
बँकॉक, 25 जुलै (हिं.स.)।थायलंड आणि कंबोडियामध्ये सुरू असलेला संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवारी(दि.२५) सकाळी दोन्ही देशांच्या सैनिकांनी सीमेवर गोळीबार केला. थायलंड सरकारने शुक्रवारी सांगितले की १ लाखाहून अधिक लोकांना त्यांचे घर सोडण्यास भाग पाडले गेले आहे. आतापर्यंत थायलंडमधील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १ सैनिक आणि १५ नागरिकांचा समावेश आहे. ४६ लोक जखमी झाले आहेत.तर कंबोडियाने आतापर्यंत मृतांचा किंवा जखमींचा अधिकृत आकडा दिलेला नाही.
हा वाद ९०० वर्षे जुन्या शिवमंदिरावरून सुरू झाला आहे, जेव्हा थाई सैन्याच्या मते, कंबोडियन सैन्याने थाई लष्करी तळांवर ड्रोन उडवले होते. बुधवारी(दि.२३) भूसुरुंग स्फोटाने हिंसाचार सुरू झाला, यामध्ये पाच थाई सैनिक जखमी झाले. या घटनेने दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. थायलंडचे आरोग्यमंत्री सोमसाक यांनी कंबोडियावर नागरिकांवर आणि रुग्णालयावर हल्ला केल्याचा आरोप केला. आम्ही कंबोडियन सरकारला हे ताबडतोब थांबवून शांततेच्या मार्गावर परत येण्याचे आवाहन करतो,असंही ते म्हणाले.
थायलंड आणि कंबोडियामधील गेल्या दशकातील सर्वात रक्तरंजित सीमा संघर्षात १००,००० हून अधिक लोक सीमावर्ती भागातून पळून गेले आहेत. थायलंडच्या लष्कराने सांगितले की त्यांनी संवादाद्वारे तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा ते यशस्वी झाले नाही तेव्हा सकाळी ८:२० वाजता जोरदार गोळीबार सुरू झाला.
कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांच्या विनंतीनुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद शुक्रवारी दोन्ही देशांमधील सीमेवरील संघर्षांवर चर्चा करण्यासाठी आपत्कालीन बैठक घेणार आहेत. तर अमेरिकेनेही हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन केले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
