वॉशिंग्टन , 16 डिसेंबर (हिं.स.)।राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी बीबीसीविरोधात 10 अब्ज अमेरिकी डॉलरच्या नुकसानभरपाईची मागणी करत खटला दाखल केला आहे. त्यांनी ब्रिटिश प्रसारकावर बदनामी केल्याचा तसेच दिशाभूल करणाऱ्या आणि अन्यायकारक व्यापारी पद्धती अवलंबल्याचा आरोप केला आहे.
बीबीसीविरोधात दाखल करण्यात आलेल्या 33 पानी खटल्यात, ट्रम्प यांची “खोटी, बदनामीकारक, दिशाभूल करणारी, अपमानास्पद, भडकावू आणि दुर्भावनापूर्ण प्रतिमा” प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार 2024 च्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा आणि ती प्रभावित करण्याचा उघड प्रयत्न असल्याचेही या खटल्यात नमूद करण्यात आले आहे.
ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, बीबीसीने 6 जानेवारी 2021 रोजी दिलेल्या त्यांच्या भाषणातील पूर्णपणे वेगवेगळ्या दोन भागांना एकत्र करून प्रसारित केले, जेणेकरून त्यांच्या वक्तव्याचा अर्थ जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने सादर करता येईल.याआधीही ट्रम्प यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात बीबीसीने 6 जानेवारीच्या भाषणातील एडिटिंगबाबत ट्रम्प यांची माफी मागितली होती. मात्र, सार्वजनिक निधीतून चालणाऱ्या या प्रसारकाने बदनामीचे आरोप फेटाळून लावले होते. बीबीसीचे अध्यक्ष समीर शाह यांनी याला “निर्णय प्रक्रियेत झालेली चूक” असे म्हटले होते. त्यानंतर बीबीसीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि बातम्यांचे प्रमुख यांनी राजीनामा दिला होता.
दरम्यान, ट्रम्प यांनी सोमवारी याआधी सांगितले होते की, त्यांच्या तोंडी शब्द घालण्यात आल्याबद्दल ते बीबीसीविरोधात खटला दाखल करत आहेत. हा खटला फ्लोरिडा येथे दाखल करण्यात आला आहे. ब्रिटनमधील न्यायालयांत हा खटला दाखल करण्याची मुदत एक वर्षांहून अधिक काळापूर्वीच संपली होती. कायदेविषयक तज्ज्ञांनी अमेरिकेत या प्रकरणासंदर्भात संभाव्य अडचणींकडेही लक्ष वेधले आहे, कारण ही डॉक्युमेंटरी तेथे प्रसारितच करण्यात आलेली नव्हती.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
