कॅनबेरा, 26 ऑगस्ट (हिं.स.)।ऑस्ट्रेलियातील एका ग्रामीण भागात मंगळवारी(दि. २६) मालमत्तेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात २ पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा हल्लेखोर अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी दुपारी घडली. पोलिस पोरेपुंका भागात एका मालमत्तेची तपासणी करण्यासाठी गेले होते. पोरेपुंका हे मेलबर्नपासून ३२० किमी उत्तर-पूर्वेकडे विक्टोरिया राज्यात आहे. कायदा अंमलबजावणी संस्थांनी दिलेल्या निवेदनांमध्ये गोळीबाराच्या वेळी १० अधिकारी तिथे का होते, यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
गोळीबारानंतर पोलिसांनी स्थानिक रहिवाशांना त्यांच्या घरात राहण्याचे आवाहन केले आहे आणि त्या भागात न जाण्याचा सल्ला दिला आहे. परिसरातील सार्वजनिक इमारती आणि जवळील विमानतळ बंद करण्यात आले आहेत.
“२ विक्टोरियन पोलिस अधिकाऱ्यांची निर्दय हत्या आणि आणखी एका अधिकाऱ्याच्या गंभीर जखमी होण्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशातील पोलिस संघाचे सदस्य स्तब्ध आणि दुःखी झाले आहेत.”, असे ‘पोलिस फेडरेशन ऑफ ऑस्ट्रेलिया’चे अध्यक्ष केविन मॉर्टन म्हणाले.
गंभीर जखमी व्यक्तीस विमानाद्वारे रुग्णालयात नेण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोरेपुंका येथील ऑस्ट्रेलियन मीडियाने सांगितले की, गोळीबाराच्या अनेक तासांनंतरही व्यापक शोधमोहीम सुरूच आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
