पुणे, 4 जानेवारी, (हिं.स) – आरोग्य सेनेतर्फे आयोजित १० वा ‘स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (स्पिफ) शनिवार (ता. ६) आणि रविवारी (ता. ७) विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात होणार आहे. रसिकांसाठी खुला असलेल्या या महोत्सवात यंदा २१ देशांमधील ४६ लघुपट पाहण्याची संधी मिळेल. शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या वेळेत महोत्सवात अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेले ४६ लघुपट दाखवण्यात येतील.
चित्रपट दिग्दर्शक गगनविहारी बोराटे, दिग्दर्शक सोहिल वैद्य आणि अमेरिकेतील दिग्दर्शक-निर्माते-लेखक बिजोन इम्तियाज हे या महोत्सवाचे मानद ज्युरी म्हणून जबाबदारी पार पाडतील. पारितोषिक वितरण आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख व महोत्सवाचे संस्थापक-संचालक डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी सात वाजता होईल.
हिंदुस्थान समाचार
