तिरुवनंतपुरम, 23 सप्टेंबर (हिं.स.)।डीआरआय आणि कस्टम विभागाने देशभरात लक्झरी कारमधील करचोरीविरोधात मोठी कारवाई केली आहे. याअंतर्गत केरळमधील अनेक ठिकाणी डीआरआय कडून छापे टाकण्यात आले आहेत. माहितीनुसार, तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम, कोट्टायम, कोझिकोड आणि मल्लपूरम जिल्ह्यांतील सुमारे ३० ठिकाणी एकाच वेळी छापेमारी सुरू आहे. या तपासात अनेक उच्चभ्रू व्यक्ती तपासाच्या कक्षेत आले आहेत. अभिनेते पृथ्वीराज आणि दुलकर सलमान यांच्या ठिकाणांवरही तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोटार वाहन विभागाच्या सहकार्याने राज्यभरातील प्रमुख कार शोरूम्सची सखोल तपासणी करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्यांच्याकडून वाहनं जप्त केली जातील, त्यांना नोटीस बजावली जाईल आणि संबंधित कागदपत्रं सादर करण्यास सांगितलं जाईल.
प्राथमिक तपासातून असं उघड झालं आहे की, ८ प्रकारच्या महागड्या लक्झरी गाड्या भूटान मार्गे भारतात आणण्यात आल्या आणि त्यामध्ये करचोरी करण्यात आली. यासाठी सर्वप्रथम हिमाचल प्रदेशमध्ये या वाहनांची नोंदणी करण्यात आली आणि त्यानंतर त्या गाड्या भारतात विविध ठिकाणी पाठवण्यात आल्या. काही प्रकरणांमध्ये वाहनांचे मूळ रजिस्ट्रेशन नंबर बदलण्यात आले, जेणेकरून त्यांच्या खऱ्या ओळखीवर पडदा टाकता येईल.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, सेलिब्रिटींच्या घरांवर करण्यात आलेली कारवाई ही फक्त चौकशी प्रक्रियेचा भाग आहे. ही कारवाई व्यवस्थित नियोजनानुसार केली जात असून, शोरूम्स आणि वैयक्तिक आयातदार यांनाही तपासाच्या कक्षेत आणलं गेलं आहे. लक्झरी गाड्या जास्त किंमती लक्षात घेता, अशा प्रकारच्या करचोरीचे प्रकार वारंवार समोर येत आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
