रत्नागिरी, 16 ऑक्टोबर, (हिं. स.) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या ३ जानेवारीपासून हौशी हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धा सुरू होणार आहे. बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून ऑनलाइन प्रवेशिका मागविण्यात आल्या असून त्याची अंतिम मुदत ६ नोव्हेंबरपर्यंत आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी दिली.
विसाव्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ३ जानेवारी २०२४ पासून विविध १० केंद्रांवर तर ६२ व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येक एका केंद्रावर १५ जानेवारीपासून आय़ोजित केली जाणार आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी प्रवेशिका http://mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध होतील. प्रवेशिका ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन भरावयाच्या आहेत.
स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
