मुंबई, २१ डिसेंबर, (हिं.स) झी मराठीच्या रिऍलिटी शो ”जाऊ बाई गावातची” चर्चा प्रत्येक जण करत आहे. दमदार दावेदार, मजेदार टास्क, खास पाहुण्यांचा जल्लोष असो ह्या सर्वामुळे कार्यक्रमाला एका वेगळ्या स्तरावर नेहून ठेवले आहे. पण ह्या भन्नाट गोष्टींना एकत्र आणतो तो म्हणजे कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. ”हार्दिक जोशी”, एक सूत्रसंचालक म्हणून उत्तम भूमिका निभावतोय पण त्याच्यासाठी ही संधी किती मोलाची आहे आणि काय शिकायला मिळालं ह्या वेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून. हार्दिकने सांगितले की त्याला आव्हानात्मक गोष्टी करायची आवड असल्यामुळे ह्या संधीच सोनं करायचे ठरवले. मनात थोडीशी धाक धुक ही होती की प्रेक्षक ह्या भूमिकेत स्वीकारतील का? पण वर्कशॉप सुरु केलं आणि ते खूप उपयुक्त ठरलं. ही संधी सोडायची नव्हती कारण एक कलाकार म्हणून शब्दांचा साठा वाढला पाहिजे असं माझं मत आहे आणि संधीच सोनं करणं आपल्या हातात असतं. महाराष्ट्रात ही संकल्पना मी पहिल्यांदाच पाहिली आणि मी स्वतःला खूप नशीबवान मानतो की मला ह्या वेगळ्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बनायची संधी मिळाली. अभिमान आहे मला आपल्या मातीशी जोडलेलं कार्य मी करत आहे. रोज नवीन गोष्टी मला ही शिकायला मिळतात. आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या गोष्टी लोकांपर्यंत ह्या कार्यक्रमाच्या निमिताने पोहचत आहेत, ह्याऊन उत्तम अजून काय असू शकतं.
ह्या कार्यक्रमाचे स्पर्धक वेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीमधून आल्या आहेत त्यांनी आपलं आयुष्य खूप ऐशोआरामात जगलं आहे, त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण जे चूक आहे ते चूक आहे आणि तिथे बोललं गेलंच पाहिजे आणि मी तेच करत आहे. जिथे आपल्या परंपरेचा- संस्कृतीचा विषय येतो तिथे त्यांना समजवून देणं एक नागरिक आणि ह्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्हणून माझं कर्तव्य आहे.
५ वर्ष मी ”तुझ्यात जीव रंगला” या मालिकेचं शूट कोल्हापुरात करत होतो. त्यामुळे माझी नाळ या मातीशी जोडली गेली आहे. मुळात माझ्या घरात माझ्यावरती लहानपणा पासून चांगले संस्कार झाले आहेत. बालवाडीत असताना माझ्या कडून मारुती स्तोत्र , राम रक्षा पाठ करून घेतला गेला, ज्या वयात नीट वाचता ही येत नव्हतं तेव्हा आज्जीने आमच्यावर हे संस्कार करायची सुरवात केली होती. आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे तरच आपण येणाऱ्या पिढीला काही शिकवू शकतो. मला वाटतं हे स्पर्धक जेव्हा इथून बाहेर पडतील तेव्हा त्यांच्या ज्ञानाची तिजोरी भरलेली असेल. माझ्यासाठी हा शो माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे . माझी वाहिनी खूप आजारी होती आणि तिच्या बरोबरचे ते शेवटचे क्षण खूप मौल्यवान होते. ”जाऊ बाई गावात” हा कार्यक्रम मी तिला समर्पित केला आहे कारण ह्या कार्यक्रमावर तिचा आशिर्वाद आहे. योगयोग असा की तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ”जाऊ बाई गावातचा” पहिला एपिसोड प्रदर्शित झाला.
”जाऊ बाई गावात” सुरु झाल्यापासून सर्वांकडून फक्त प्रेम आणि प्रोत्साहन मिळतंय, आणि ही सुरुवात आहे ह्या कार्यक्रमात प्रेक्षकांना खूप काही पाहायला मिळणार आहे, ज्याचा त्यांनी विचारही केला नसेल.
तेव्हा पाहायला नका विसरु ‘जाऊ बाई गावात” सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त आपल्या झी मराठी वाहिनीवर
हिंदुस्थान समाचार
