लंडन, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।७९व्या ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कार सोहळ्यात (बाफ्टा) दिवंगत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जागतिक चित्रपटसृष्टीतील आता आपल्यात नसलेल्या महान व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला.यावेळी प्रत्येक भारतीय चाहत्याच्या डोळ्यांत पाणी आले. कार्यक्रमात गेल्या वर्षभरात आपल्याला सोडून गेलेल्या विविध मान्यवरांना आदरांजली वाहण्यात आली आणि त्यामध्ये धर्मेंद्र यांचाही विशेष उल्लेख करण्यात आला.
लंडनमधील रॉयल फेस्टिव्हल हॉल येथे आयोजित ७९व्या बाफ्टा सोहळ्यात धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. या वेळी जेसी वेअर यांनी मंचावर येत बार्बरा स्ट्रेइसँड यांचे ‘द वे वी वेअर’ हे गाणे सादर केले. या भावनिक संगीत श्रद्धांजलीदरम्यान एक व्हिडिओही दाखवण्यात आला, ज्यामध्ये मागील वर्षात दिवंगत झालेल्या चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तींना स्मरण करण्यात आले.
‘इन मेमोरियम’ या विभागात डायन कीटन, टेरेन्स स्टॅम्प, कॅथरीन ओ’हारा, रॉब रेनर, जीन हॅकमॅन, रॉबर्ट डुवॉल, टॉम स्टॉपर्ड, ब्रिजिट बार्डो, लॅलो शिफ्रिन, मायकेल मॅडसेन आणि व्हॅल किल्मर यांसारख्या दिग्गजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याच वेळी भारतीय दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचाही उल्लेख करण्यात आला.
धर्मेंद्र यांचे मागील वर्षी २४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. सुमारे आठवडाभर उपचार घेतल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना घरीच उपचार देण्याचा निर्णय घेतला. अखेर २४ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
