छत्रपती संभाजीनगरमध्ये नवव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, 4 जानेवारी (हिं.स.) – देशातील अन्य ठिकाणांपेक्षा महाराष्ट्रात साहित्य, संस्कृती, कविता, नृत्य आदी कलेचा सन्मान केला जातो. आपण सध्या वेगात प्रगती करीत आहोत. या प्रगतीची ट्रेन वेगात असून, सोबतचे सामान प्लॅटफॉर्मवरच राहिले आहे. असे असले तरी प्रगती करताना साहित्य, संस्कृतीला सोडू नये, असे आवाहन प्रख्यात गीतकार, संवादलेखक पद्मभूषण जावेद अख्तर यांनी केले. मुंबई ही व्यावसायिक असली तरी महाराष्ट्रातील इतर शहरे संस्कृती, मूल्य, नैतिकता जाेपासण्याचे काम करीत असल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथे नवव्या अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बुधवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांना या महोत्सवात पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक अशोक राणे, उद्योगपती नंदकुमार कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, आदींची उपस्थिती होती.
अख्तर पुढे म्हणाले की, कालसुसंगत चित्रपट आणि त्यातील मूल्य यात वाईट व्यक्तिरेखा कोणती, हे न ठरवता येणारा काळ आहे. जर संभ्रम नसता तर खूप साऱ्या व्यक्तिरेखा पकडता आल्या असत्या. पण वाईट कोणाला म्हणायचे, असा प्रश्न आहे. भौतिक सुख शोधण्याच्या नादात आपण आपले साहित्य, संगीत, संस्कृती यालाच मागे सोडून आलो आहोत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘चोली के पिछे क्या है’ हे गाणे लोकप्रिय ठरते, तेव्हा घाबरण्याची वेळ आलेली असते. आता संवेदनशीलता आणि रसिकता याचा मिलाफ होत असताना अशा दिग्दर्शक आणि सिनेमा निर्मात्यांबरोबर आपण किती काळ राहतो, यावर भारतीय सिनेमाचे भवितव्य अवलंबून असेल, असे मत यांनी व्यक्त केले.
पूर्वीच्या काळी नायक कोण आणि खलनायक कोण आहे, याबद्दल समाजाची भूमिका स्पष्ट होती. परंतु, आजच्या गुंतागुंतीच्या काळात समाजाचीच भूमिका संभ्रमित असल्यामुळे नायक कोण असायला हवा हा दिग्दर्शकांसमोर मोठा पेच आहे. सध्या गरीब-श्रीमंत असे काही राहिले नाही. प्रत्येकाला करोडपती बनायचे आहे. गरिबाला श्रीमंताविषयी काही वाटत नाही. त्यालाही श्रीमंत बनायचे आहे. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. ज्या काळात आम्ही लिहिले ते आता मागे वळून पाहताना विश्वास बसत नाही. पण आम्ही लिहित गेलो, लोकांना आवडत गेले. ती लोकांची बात होती, मन की बात नव्हती, असेही जावेद अख्तर यांनी आवर्जून सांगितले.
हिंदुस्थान समाचार
