तिरुवअनंतपुरम, २९ डिसेंबर (हिं.स.) : तीन दशकांहून अधिक काळ नाट्यविश्वात आपली छाप सोडणारे प्रसिद्ध मल्याळी नाटककार प्रशांत नारायणन यांचे गुरुवारी तिरुवअनंतपुरम येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. त्यांच्यावर फुफ्फुसाच्या आजारावर उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नारायणन यांनी जवळपास ६० नाटकांचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात नाटकेही लिहिली, त्यातील काही नाटकांनी भाषेच्या सीमा तोडून नाट्यप्रेमींची मनेही जिंकली. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते मोहनलाल आणि मुकेश यांनी प्रशांत लिखित ‘छायामुखी’ या नाटकात काम केले होते, ज्यामुळे दिग्दर्शक म्हणून प्रशांत यांची ख्याती मल्याळी भाषिक प्रेक्षकांमध्ये आणखी वाढली.
नारायणन यांनी ‘मणिकर्णिका’, ‘ताजमहाल’ आणि ‘कारा’ यांसारख्या अनेक प्रसिद्ध नाटकांचे दिग्दर्शनही केले होते. नारायणन यांना २००३ मधील सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनासाठी केरळ संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
प्रतिभावान कलाकार गमावला – केरळ सांस्कृतिक कार्य मंत्री
केरळचे सांस्कृतिक कार्य मंत्री साजी चेरियन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, राज्याने एक प्रतिभावान कलाकार गमावला आहे. ज्याने गेल्या तीन दशकांमध्ये रंगभूमीच्या जगावर आपली छाप सोडली आहे.
हिंदुस्थान समाचार
