हैदराबाद, ११ नोव्हेंबर (हिं.स.) : दाक्षिणात्य (तेलुगू) सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चंद्र मोहन यांचे निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी जालंधर आणि दोन मुली असा परिवार आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या म्हणण्यानुसार, चंद्र मोहन यांना हृदयविकाराच्या आजारामुळे हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान शनिवारी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
चंद्र मोहन यांच्या निधनाची बातमी समोर येताच मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते आणि स्टार्स त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
चंद्र मोहन यांचे अंतिम दर्शन आणि अंत्यसंस्कार विधी सोमवारी हैदराबादमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्र मोहन यांनी १९६६ मध्ये आलेल्या रंगुला रत्नम या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पाधारीला वायासू, चंदामामा रावे, अथनोक्कडे, 7जी वृंदावन कॉलनी, मिस्टर अशा अनेक चित्रपटांमधील अभिनयासाठी ते लोकप्रिय होते. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी सुमारे ९३५ चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यापैकी अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यांना अनेक नंदी पुरस्कार मिळाले आहेत. श्रीदेवी, जयाप्रदा, जयसुधा यांसारख्या अभिनेत्रींसोबत चंद्र मोहन यांनी काम केले आहे.
दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर याने पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. त्याने म्हटले आहे, अनेक दशकं सिनेमात विविध भूमिका साकारुन आपली खास ओळख बनवणारे चंद्र मोहन यांच्या आकस्मिक निधनाने अतिशय दु:ख झालं आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना असून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
हिंदुस्थान समाचार
