ठाणे, 24 नोव्हेंबर (हिं.स.) ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह येथे ६२ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी सुरू होत आहे. २८ नोव्हेंबर ते ४ जानेवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. ठाण्यातील ज्येष्ठ रंगकर्मी, साहित्यिक, मान्यवर कलाकार ह्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडेल. आई एकविरा सांस्कृतिक कलामंच, भेंडखळ या संस्थेच्या “पैशाने तुटली नाती” या नाटकाने स्पर्धेचा शुभारंभ होईल. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी नमूद केले आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण पंचवीस संघांचा सहभाग असणार आहे. ठाणे जिल्ह्यासह रायगड आणि पालघर जिल्ह्याचे संघही या स्पर्धेत सहभागी होऊन आपले प्रयोग सादर करतील. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे हे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ठाणे केंद्राचे स्पर्धा समन्वयक म्हणून रंगकर्मी प्रफुल्ल गायकवाड काम पाहत आहेत.
हिंदुस्थान समाचार
