
मुंबई, ११ जुलै, (हिं.स.) – अभिनेता हर्षवर्धन राणे सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘सिला’ मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘मेरी कॉम’ आणि ‘सरबजीत’ सारख्या प्रशंसित चित्रपटांचे दिग्दर्शक ओमंग कुमार करत आहेत. ‘सिला’ हा एक रोमँटिक अॅक्शन ड्रामा असून हर्षवर्धन पहिल्यांदाच अभिनेत्री सादिया खतीबसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या फ्रेश जोडीबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
आता ‘सिला’ मधील हर्षवर्धनचा एक नवा लुक समोर आला आहे, ज्यामध्ये तो अत्यंत इंटेन्स आणि दमदार अंदाजात दिसत आहे. हा लुक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
हर्षवर्धन राणेने अलीकडेच ‘सिला’च्या सेटवरील एक अनुभव शेअर केला आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले, ‘सिला’च्या शूटिंगदरम्यान एका अॅक्शन सीनमध्ये मला माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच खरं म्हणजे खरंच दुखापत झाली. आता अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि टॉम क्रूझ यांच्यासारख्या अभिनेत्यांचा अजूनच आदर वाटतो, जे असे सीन वर्षानुवर्षे करत आहेत.
त्यानंतर तो म्हणाला, ओमंग कुमार सर, धन्यवाद माझ्यातल्या त्या बाजूला जागं केल्याबद्दल, ज्या बद्दल कदाचित मलाच माहिती नव्हती. हर्षवर्धनचा हा समर्पण भाव त्याच्या भूमिकेप्रती असलेल्या निष्ठेचं आणि मेहनतीचं उदाहरण आहे.
अलीकडे रिलीज झालेल्या ‘सिला’ च्या पोस्टरमध्ये हर्षवर्धन राणे अत्यंत इंटेन्स लुकमध्ये दिसतो आहे. त्याचं रक्ताने माखलेलं चेहरा आणि डोळ्यातील राग, चित्रपटातील तीव्र अॅक्शनची झलक दाखवतो. चित्रपटाचं चित्रीकरण आधीच सुरू झालं आहे.
या प्रोजेक्टमध्ये ‘बिग बॉस १८’ चा विजेता करणवीर मेहरा देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे, तर इप्सिता याही एक महत्त्वाचा भाग असणार आहेत.
‘सिला’ व्यतिरिक्त हर्षवर्धन राणेच्या हातात ‘एक दीवाने की दीवानियत’ हा आणखी एक रोमँटिक थ्रिलर प्रोजेक्ट आहे, ज्याचं दिग्दर्शन मिलाप मिलन करत आहेत. या चित्रपटात हर्षवर्धन पहिल्यांदा सोनम बाजवासोबत स्क्रीन शेअर करणार आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
