लखनौ, १५ जानेवारी (हिं.स.) : लोकप्रिय उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी लखनौच्या पीजीआय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना किडनीचाही आजार होता.
मुनव्वर यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९५२ रोजी उत्तर प्रदेशातील रायबरेली याठिकाणी झाला होता.
लोकप्रिय उर्दू कवी आणि लेखक होते. वेगळ्या लेखनशैलीमुळे त्यांच्या गझलाही लोकप्रिय झाल्या आहेत. २०१४ मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘शाहदाबा’ या कवितेसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर वर्षभरात त्यांनी हा पुरस्कार परत केला. देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे राज्य प्रायोजित सांप्रदायिकतेमुळे पुन्हा कधीही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही, असे त्यांनी वचन दिले. २०१२ मध्ये त्यांना उर्दू साहित्यातील सेवेबद्दल शहीद शोध संस्थेने माती रतन सन्मानाने सन्मानित केले.
साहित्यासह मुनव्वर राणा हे राजकारणातही सक्रिय होते. त्यांची मुलगी सुमैया ही समाजवादी पक्षात सक्रिय आहे. राणा नेहमीच कोणत्या ना कोणत्या राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत राहिले. त्यांची काही गोष्टींवरील मतं नेहमीच वादग्रस्त ठरली. पॅरिस येथील शिक्षक सॅम्युअल पॅटी यांच्या हत्याकांडाला दिलेल्या पाठिंब्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. तसेच तालिबानला केलेल्या समर्थनामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.
त्यांच्या पार्थिवावर आज, सोमवारी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मुनव्वर यांची मुलगी सुमैयाने दिली.
हिंदुस्थान समाचार
