पालघर, 4 ऑगस्ट (हिं.स.)।
पालघर तालुक्यातील माहीम येथील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडून त्यातील १४ लाख ३५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या धाडसी दरोड्यात चोरट्याने एका पांढऱ्या चारचाकी वाहनांचा वापर केल्याची बाब सीसीटीव्हीच्या रेकॉर्डिंगमधून नुकताच समोर आली आहे.
माहीम बाजार येथे एसबीआय बँकेचे एटीएम असून एटीएमची मशीन गॅस कटरने कापून त्यातून १४ लाख ३५ हजार रुपयांची रोकड शुक्रवारी रात्री चोरट्याने चोरून नेली. चोरी केल्यानंतर आपली ओळख आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी एटीएमलाच आग लावली होती.
या घटनेत तीन ते चार चोरटे एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून आले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे पोलिसांच्या हाती नुकताच लागले आहेत. ही चोरी माहीम बाजारपेठेतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये झाली असून चोरीनंतर चोरटे पसार झाले आहेत.
२३ जुलै रोजी या स्टेट बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम भरण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याची माहिती चोरट्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी एखाद्या स्थानिक चोरट्याने घेतली असावी आणि त्याचाही चोरीमध्ये हातभार असावा, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांना मार्गदर्शन केले. हिताची नावाच्या कंपनीचे हे कॉन्ट्रॅक्ट असून त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात सुरू होती.
—————
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL
