नाशिक, 20 सप्टेंबर (हिं.स.) : सिडको परिसरातील स्टेट बँक चौकात काल रात्रीच्या सुमारास दोन मद्यधुंद तरुणींनी धिंगाणा घातल्याची घटना घडली. या तरुणींचा धिंगाणा घातल्याचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
सिडको परिसरातील स्टेट बँक चौकात काल रात्रीच्या सुमारास दोन मद्यधुंद तरुणी जोरजोरात ओरडत होत्या. या तरुणींनी एका इसमाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्याची कॉलर पकडून त्याला मारहाणही केली. त्यानंतर तरुणींनी फोन करून त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले.काही वेळातच दुचाकीवर आलेल्या तरुणांनी या तरुणींची अवस्था पाहून त्यांना गाडीवर बसवून तेथून पसार झाले. दरम्यान बघ्यांची गर्दी झाली होती. भर वस्तीत असा प्रकार घडल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यापूर्वीही इंदिरानगर आणि गंगापूर परिसरात मद्यधुंद तरुणींनी गोंधळ घातल्याचे प्रकार समोर आले होते. पोलिसांनी दोन्ही मुलींना पोलीस ठाण्यात आणले असून, पुढील कारवाई सुरू आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV
