मुंबई, 20 सप्टेंबर, (हिं.स.)। पत्नी प्रिया मराठे च्या निधनानंतर प्रथमच शंतनू मोघे याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मधल्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं गरजेचं होतं म्हणून मी कुठेही दिसलो नाही. पण आता आयुष्यातील ते कठीण वळण पार करून पुन्हा कामावर परतलो आहे. माझे वडील नेहमी सांगायचे – आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो. वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष असला तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणं गरजेचं आहे. व्यक्तिरेखेचं कमिटमेंट पाळणं हाच आपल्या व्यवसायाशी प्रामाणिकपणा आहे. काम करत राहणं हीच प्रियाला खरी श्रद्धांजली आहे!, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
तो म्हणाला, आजपर्यंत प्रेक्षकांनी प्रिया आणि माझ्यावर जेवढं प्रेम केलं, तीच आमची खरी ताकद आहे. या शब्दांतून त्याच्या पत्नीबद्दलची जिव्हाळ्याची आठवण आणि कलेप्रती असलेलं समर्पण स्पष्टपणे जाणवतं.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
