नांदेड, 31 जानेवारी, (हिं.स.) – गाईचे वासरू एका कारमध्ये कोंबून चोरुन नेल्याची घटना नुकतीच नरसीत घडली आहे. याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नरसी येथील शेतकरी पांडुरंग हाणमंतराव खनपटे यांचे गाय आणि वासरू रोजच्या प्रमाणे चारण्यासाठी बाहेर गेले होते.
दरम्यान गाय वासरू नरसीतील मध्यवर्ती बँकेच्या समोर नरसी बिलोली रोडवर डिव्हायडरवर बसले होते. दरम्यान बिलोलीकडून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारमधील इसमांनी गायीचे वासरु कारमध्ये कोंबून पोबारा केला. आपल्या वासराला कारमध्ये कोंबून नेत असल्याचे लक्षात आल्यावर गायीने आपल्या परीने वासराला चोरट्यांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला. हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत गाय वासराचे मालक पांडुरंग खनपटे यांनी रामतीर्थ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis
