सोलापूर, सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासू व मुलीच्या आई- वडिलांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या पतीला अटक केली असून न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (ता. १९) पोलिस कोठडी ठोठावली आहे.सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मुलीचा विवाह तिच्या नात्यातील २३ वर्षीय तरुणाशी काही महिन्यांपूर्वी झाला होता.
विवाहानंतर गर्भवती राहिलेली अल्पवयीन मुलगी तपासणीसाठी दवाखान्यात गेली होती. त्यावेळी त्या मुलीचा विवाह अल्प वयात झाल्याची बाब लक्षात आली.सदर बझार पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्यासंदर्भात शहानिशा केली. पोलिस उपनिरीक्षक संजिवनी व्हट्टे यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या पतीला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालविवाह व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला. अल्पवयीन मुलगी सध्या साडेसतरा वर्षांची असल्याचे पोलिसांनी सांगितले.
