नाशिक, : रेल्वे स्थानकात गाडी येण्याची वाट पाहत झोपी गेलेल्या युवक प्रवाशाचा मोबाईल चोरून नेणाऱ्या चोरट्यास लोहमार्ग पोलिसांनी मोबाईलसह काही तासांत ताब्यात घेतले.
याबाबत माहिती अशी की, चांदवड येथील स्वप्नील आघाव (वय २५) हा युवक नांदगाव येथे जाण्यासाठी नाशिकरोड स्थानकात आला होता. रेल्वे गाडी उशिरा असल्याने तो युवक जुने बुकिंग ऑफिस येथे आराम करीत झोपी गेला. त्यावेळी त्यांच्या जवळील नऊ हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबवला.
लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर काही तासात पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष उफाडे पाटील, पोलीस हवालदार विश्वास सुरवाडे,विलास इंगळे, शैलेश पाटील, विजय कपिले, रघुनाथ सानप, धांडे, रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश यादव व मनीष कुमार यांनी रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालीत असताना त्यांनी घटनास्थळाच्या आसपास फिरणाऱ्या आकाश विठ्ठल चव्हाण (वय ३१, रा. यवतमाळ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा मोबाईल ताब्यात घेतला.
