सोलापूर, 7 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकार्डवरील गुन्हेगारांत शोधात पेट्रोलिंग करीत असताना तालुका पोलिसांच्या पथकास सोलापूरपासून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथे संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्या एका आरोपीला पळून जाताना पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे २३ किलो ८५० ग्रॅम वजनाचा तब्बल ४ लाख ७७ हजार रुपयांचा गांजा हाती लागला. या प्रकरणी एक पकडला गेला तर दुसरा अगोदरच निसटला.
आकाश राजकुमार सोनकडे, (वय २२, रा. सोनकडे वस्ती, होटगी, दक्षिण सोलापूर) असे अटक केेलेल्या आरोपीचे नाव असून, आकाश पंडित काळे (रा. कुंभारी रोड, वीटभट्टीजवळ, सोलापूर) हा पोलिसांचे पथक येण्यापूर्वीच निसटला. दोघांविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. जप्त केलेल्या गांजासह २० हजार रुपयांचा मोबाइल, ६ लाख ५० हजारांची कार असा एकूण ११ लाख ४७ हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. दोघांविरुद्ध सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल ईज्जपवार करीत आहेत.
