डोंबिवली, : कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार दत्ताराम भोसले आणि पोलीस शिपाई गुरुनाथ जरग यांना काहीजण गाळा क्रं.१३/१४, संतलाल शर्मा यांची निर्माणधिन इमारत, तरंग हॉटेलजवळ, खोणी गाव, काटई बदलापूर पाईपलाईन रोडवर बनावट बटर बनवीत असल्याची माहिती मिळाली. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला. यात पोलिसांनी कारवाई करत मानवी सेवनास हानीकारक असलेले अवैध बटर बनविणाऱ्या दोघांना अटक केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू झिनक यादव ( ३६, रा. संतलाल शर्मा यांची बिल्डींग, तरंग हॉटेलच्या बाजूला, खोणी गाव, बदलापुर काटई रोड, डोंबिवली पूर्व आणि प्रेमचंद फेकुराम ( ३२, . संतलाल शर्मा यांची बिल्डींग, तरंग हॉटेलच्या बाजूला, खोणी गाव, बदलापुर काटई रोड, डोंबिवली पूर्व ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
या कारखान्याचा मालक पिंटू हा मानवी सेवनास हानीकारक असलेल्या अवैध बटरला अमूल कंपनीच्या नावाने बटर पेपर लावून विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या कागदी बॉक्स मध्ये ते पॅक करून किरकोळ हॉटेल्स तसेच सॅडव्हीच हातगाडी व ढाबे यांना ओरीजनल बटर म्हणून पुरवीत होता. पोलिसांनी हे बटर व बटर बनविण्याचे साहित्य , मशीन, कच्चा माल असा सुमारे २ लाख ९३ हजार २५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
