पुणे, 28 जानेवारी : पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात असणाऱ्या एका ओयो हॉटेलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. गोळ्या झाडून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हिंजवडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वंदना द्विवेदी असं मृत महिलेचं नाव असून या प्रकरणात ऋषभ निगम नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्कमध्ये एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली वंदना द्विवेदी कामाला होती. ऋषभ निगम आणि तिचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर येत आहे. दोघेही लखनऊ येथील राहणारे असून गेल्या दोन दिवसांपासून ते या हॉटेलमध्ये राहत होते. मात्र, काही कारणावरून त्यांचे वाद झाले असावे. त्या वादातून ऋषभ याच्याकडे बंदूक असल्याने त्याच बंदुकीतून त्याने येथील ओयो हॉटेलमध्ये वंदना हिची गोळ्या घालून हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
