नाशिक, १६ मार्च, : जिल्ह्यामध्ये वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात प्रामुख्याने पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या तालुक्यात महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमालगत राखीव वन क्षेत्रात मौल्यवान खैर प्रजाती झाडांचे महामंडळाचे रोपवन आहेत. या क्षेत्रात कायम गुजरात राज्यातून अनेक वनतस्कर सामूहिक टोळ्याने खैर वृक्ष तोड करून वाहतूक करताना आढळतात. या खैर तस्करांना आळा बसावा याकरिता वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र वनसंरक्षणाचे काम करत आहेत.
पेठ तालुक्यात वनविकास महामंडळाच्या राखीव वनक्षेत्रात दि. १५ मार्च रोजी फिरते पथक पेठ अंबा झरी वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी रात्री गस्त करून वनसंरक्षणाची कामे करत असताना त्यांना गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली होती की वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ९६ गोळस्पडा बीट मधून काही अज्ञात आरोपी अवैधरित्या खैर झाडांची तोड करून त्याची वाहनाने वाहतूक गुजरात राज्यात करणार आहेत. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळावर सापळा रचून अवैधरित्या खैर झाडाची तोड करून वाहनांमध्ये भरणा करत असताना एक खैर तस्कर आरोपी किरण देविदास महाले राहणार नागाचा पाडा याला खैर नग ४१ व महिंद्रा बॉलोरो कंपनीची जीप अशा ५ लाख रुपयाच्या मुद्देमालसह स्थळावर जप्त करण्यात आले. काही गुजरात राज्यातील १० आरोपी रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. तसेच अटक केलेल्या व फरार आरोपी वर वन गुन्हा नोंद करून चौकशी सुरू केली. अटक केलेले आरोपी किरण महाले यांनी सोबत असलेले आरोपी विलास चावरा, ललित मुडा, दौलत चौधरी, गणेश जाधव, प्रभाकर चावरा, जगदीश चौरे, जगदीश भवरा, सुभाष भाई भवर, जगदीश महाले, नवसु लोहार, प्रमुख चावरा हे सर्व घटनास्थळावरून फरार झाल्याची कबुली दिली .
या फरार आरोपीचा शोध वनाधिकारी करत आहे. अटक केलेल्या एक आरोपींला आज न्यायालयात हजर केले असता नाशिक जिल्हा न्यायालयांनी त्याला 28 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे
पेठ तालुक्यात झालेल्या या कारवाईमुळे महाराष्ट्र व गुजरात बॉर्डरवर खैर तस्करी करणारे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कार्यवाहीमुळे वन तस्करावर नक्कीच काही प्रमाणत अंकुश लागेल अशी परिसरात चर्चा आहे.
