मुंबई, 16 मार्च लवकरच येत आहे एका भावी वडिलाची कथा जो थेट समाजाला विचारतो की समाजात मुलींना संरक्षण मिळू शकेल का आणि माझी मुलगी या समाजात सुरक्षित असेल का?
मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते, वडील धनंजय सरदेशपांडे यांच्याकडून अभिनय आणि लेखनाचं बाळकडू घेऊन मराठी मालिकांमध्ये झळकणारा अभिनेता चैतन्य सरदेशपांडे आता ‘एक सुलगता सवाल…’ या हिंदी कलाकृतीतून एक अनोखी भूमिका साकारणार आहे. सर्व मराठी मालिकांना मागे टाकून अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणारा चैतन्य हिंदी सिनेसृष्टीत पाऊल टाकत आपलं नाणं खणखावून पाहणार आहे. चैतन्यने आपली भूमिका अतिशय संवेदनशील आणि भावनिक पद्धतीने साकार केली आहे.
‘एक सुलगता सवाल…’ ही कलाकृती प्रभू कुंज प्रॉडक्शन्स यांनी निर्मित केली असून सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रदीप दळवी यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रदीप दळवी यांनी हा संवेदनशील विषय पडद्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला असून आणि त्यांचा प्रयत्न नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणार आहे.
लघुचित्रपटाचे छायाचित्रण सचिन लोखंडे यांनी केले आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले, चैतन्य सरदेशपांडे आणि प्रदीप पटवर्धन यांनी कथेला न्याय देणाऱ्या आपल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच अभिनेत्री सुप्रिया गायगे, ज्योत्स्ना विल्सन आणि ज्योती निसाल या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा लघुचित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या अनेक नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार असून प्रेक्षकांच्या मनात एक धगधगता विचार पेरणार आहे.
समाजातील या ज्वलंत विषयावर बनवलेला हा लघुपट प्रेक्षकांना आवडेल आणि या कलात्मक लघुपटाला दाद देऊन ते यशाच्या दिशेने कूच करण्यास प्रचंड प्रतिसाद देतील अशी आशा आहे.
