सोलापूर , 16 ऑक्टोबर : मोहोळजवळील चिंचोली एमआयडीसीतील एका फॅक्टरीवर मुंबई क्राईम ब्रॅंचच्या ९ नंबर पथकाने धडक कारवाई करीत त्या कंपनीला सील ठोकले आहे. मुंबईत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या सोलापूरच्या दोघांना या पथकाने जेरबंद केले. या पथकाचे प्रमुख तथा इन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारने बंदी घातलेले एमडी हे केमिकल ड्रग्ज आरोग्यासाठी फार घातक मानले जाते. मुंबई क्राईम ब्रॅंचने त्याठिकाणी राहुल किसन गवळी व अतुल किसन गवळी यांच्या ताब्यातून आठ किलो म्हणजेच अंदाजे १६ कोटी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले, त्यावेळी न्यायालयाने दोघांनाही १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. दरम्यान, त्या दोघांनाही मुंबईतून अटक केल्यानंतर क्राईम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांनी मोहोळ येथे येऊन चिंचोली एमआयडीसीतील या कंपनीला सील ठोकले आहे. सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांना कोणताही माहिती न देता मुंबईच्या क्राईम ब्रॅंचच्या ९ नंबर पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, आता ते कधीपासून अनधिकृत ड्रग्ज तयार करीत होते, त्यांनी कोठे-कोठे त्याची विक्री केली आहे, याचा सखोल तपास सुरु आहे.
