रत्नागिरी, 15 नोव्हेंबर, (हिं. स.) : आजारपणाला कंटाळून कीटकनाशक घेऊन आसूद (ता. दापोली) येथील मनोज बळीराम जाधव (वय ४० वर्षे) यांनी आत्महत्या केली. त्यामुळे ऐन दीपोत्सवात आसूद तेलीवाडीत राहणाऱ्या जाधव कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मनोज जाधव हा शेतकरी कुटुंबातील विवाहित तरुण होता तो उत्कृष्ट मेकॅनिकही होता. टेम्पो दुरुस्त करणे ही त्याची खासियत होती. घरातील पत्नी व मुले शेतात कामाकरिता गेले असताना घरी कोणी नसताना गेल्या २९ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याने कीटकनाशक औषध प्राशन केले. काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागले. या घटनेची माहिती शेजारी तसेच कुटुंबाला मिळताच त्याला तत्काळ दापोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अधिक उपचारांकरिता तात्काळ हलवण्यात आल. येथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
मनोज बळीराम जाधव याच्या पश्चात त्याची पत्नी, दोन लहान मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्याला गेले काही दिवस मूतखड्याचा त्रास होऊ लागला होता. याच आजारपणाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
हिंदुस्थान समाचार
