सोलापूर, 28 जानेवारी, : माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांच्या कार्यालयात एका ७७ वर्षीय वृद्धानं गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
अल्लाउद्दीन रहेमान शेख (वय- ७७, रा.९७ गांधी नगर अक्कलकोट रोड सोलापूर) असे मयताचे नाव आहे. यातील वृद्धाने माजी आडम मास्तर यांच्या सीआयटू कार्यालयात पत्र्याच्या लाकडी वाशाला बॉक्स पॅकिंग करण्याच्या नायलॉन पट्टीनं गळफास घेतल्याचे दुपारी उघडकीस आले.
याची खबर मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे हवालदार बी. बी. घुगे घटनास्थळी धावले. त्यांनी इतरांच्या मदतीने बेशुध्दावस्थेतील वृद्धास खाली उतरवले. ॲम्ब्युलन्सद्वारे त्याला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. संबंधित प्रकाराचे कारणाचा शोध घेतला जात असल्याचे जेलरोड पोलिसांकडून सांगण्यात आले.
