नाशिक, ०८ फेब्रुवारी : सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू ठेवायचे असेल, तर इलेक्ट्रिक ठेकेदाराकडून एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या पाच तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मयूर राजेंद्र गोरडे (रा. मुकुंदनगर, गंगापूर रोड, नाशिक) हे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असून, ते मे. अवनीश एंटरप्रायजेस या कंपनीचे सुपरवायझर म्हणून काम बघतात. या कंपनीला सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ मधील हनुमान चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे कंत्राट मिळाले आहे. त्यानुसार गोरडे व त्यांचे सहकारी सुनील कापसे, कैलास कापसे व किशोर साळवे यांच्यासह गेले होते. हे सर्व जण सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पोल बसविण्याच्या कामाची सुरुवात करीत असताना आरोपी आदेश खांडरे, ऋतिक साळुंके, यश निकम, चेतन शेलार व अक्षय खांडरे हे पाच जण तेथे आले. त्यांनी तेथे येऊन या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम करू नका. हा चौक आमचा आहे. या ठिकाणी आमच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येणार नाही, असे म्हणाले. त्यावेळी फिर्यादी गोरडे यांनी हे सरकारी काम आहे, असे सांगितले; परंतु पाचही आरोपींनी फिर्यादी गोरडे व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी आदेश खांडरे याने गोरडे यांना, मोबाईलवरून शिवीगाळ केली, तसेच येथे काम सुरू करायचे असेल, तर एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करून दमदाटी केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गोरडे यांच्या फिर्यादीनुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
