सिन्नर, ५ डिसेंबर, (हिं.स) : येथील शिवाजीनगर परिसरातून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची एकदाणी माळ ओरबाडून पोबारा करणाऱ्या दोघा दुचाकीस्वार चोरट्यांना सिन्नर पोलिसांनी अवघ्या दोन तासात गजाआड केले.
सोनू अशोक भट्टेवाल (वय २०, रा. राणेनगर, नाशिक) व खोवड्या ऊर्फ रोशन संतोष जोरी (वय १९, रा. पंचायत समितीसमोर, सिन्नर) अशी या चोरट्यांची नावे आहेत. शिवाजीनगर येथील सिद्धेश्वर कॉलनी येथे राहणाऱ्या शांताबाई ज्ञानदेव शिंगणे (वय ६५) ही महिला रात्री ८ वाजेच्या दरम्यान परिसरातील दत्त मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत होती. यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून भरधाव वेगात आलेल्या दोघा चोरट्यांनी शांताबाई यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची एकदानी माळ ओरबाडून पोबारा केला. शांताबाई यांनी आरडाओरड केली; मात्र चोरटे हाती लागले नाही. यानंतर शांताबाई यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान बो-हाडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड यांनी शहर परिसरात या चोरट्यांचा शोध सुरू केला.
दरम्यान, नायगाव रोड परिसरात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न दोघा मोटारसायकलस्वार चोरट्यांनी केला; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. संबंधित महिलेने समयसूचकता दाखवत आरडाओरड केल्याने चोरटे त्यांची केटीएम दुचाकी (क्र. एमएच ०१ बीएन ९९०७) तिथेच सोडून पसार झाले. पोलिसांच्या शोध पथकाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी हस्तगत केली. या दुचाकीच्या पेट्रोल टाकीच्या झाकणात ब्लेड ठेवलेले आढळले. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढत सोनू भट्टेवाल व रोशन जोरी यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
हिंदुस्थान समाचार
