नाशिक, 8 सप्टेंबर (हिं.स.) कंटेनर थांबवून कोयत्याने हल्ला करीत रोख रक्कम व क्यूआर कोडवरून पैसे उकळणाऱ्या टोळी विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन महिलांना अटक करण्यात आली असून, अन्य तीन फरारी युवकांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
ही घटना दि. ७ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील चेहेडी-दारणा पुलाजवळ घडली. रामनिवास गंगाप्रसाद वर्मा (३८, रा. मध्य प्रदेश) हे कंटेनरचालक महिंद्रा कंपनीत नोकरीस असून, त्यांनी नाशिक येथून एमएच ०४ एमआर ०९४८ या क्रमांकाच्या कंटेनरमध्ये माल भरून अहिल्यानगरकडे प्रयाण केले होते.
चेहेडी पुलाजवळ चार ते पाच जणांनी त्यांचा कंटेनर अडवला. त्यातील एक जण थेट ड्रायव्हर केबिनमध्ये शिरला व त्याने वर्मा यांच्या मनगटावर कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी केले. त्याच वेळी इतर चार जण रिक्षातून आले. त्यांनी वर्मा यांच्या खिशातील पाच हजार रुपये रोख काढले आणि आणखी पैशांची मागणी करीत मारहाण सुरू केली. कंटेनर मालकाच्या कोडवरून एक हजार रुपये वसूल केले.
दरम्यान, या घटनेवेळी गस्तीवर असलेले पोलीस वाहन घटनास्थळी आल्यानंतर आरोपी युवकांनी महिलांना तेथेच सोडून रिक्षातून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ निकिता विलास आव्हाड (२९), कोमल सुरेश आढाव (२३) यांना ताब्यात घेतले असून, प्रेम घाटे, धीरज घाटे व शुभम् आढे हे फरारी झाले आहेत. रामविलास वर्मा यांच्या फिर्यादीवरून वरील पाचही आरोपींविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत
—————
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV
