परभणी, 17 फेब्रुवारी, (हिं.स.)। शाळेच्या समोर थांबून विनाकारण फिरताना व मुलींना त्रास देण्याच्या उद्देशाने आढळून आलेल्या दोन जणांवर निर्भया पथकाने सोमवारी दुपारी कारवाई केली. अल्पवयीन असलेल्या या दोन मुलांच्या पालकांना बोलावून त्यांना घडलेला प्रकार सांगून मुलांना समज देण्यात आली.
निर्भया पथकाकडून गोपनीय माहितीच्या आधारे शाळा परिसरात टवाळखोरांवर नजर ठेवून कारवाई केली जाते. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयासमोर दरम्यान हे पथक पोहोचले होते.
येथे दोन मुले शाळेसमोर विनाकारण फिरताना व मुलींना त्रास देताना मिळून आली. त्यांना ताब्यात घेऊन पालकांना बोलावण्यात आले. मुलांना समज देण्यात आली. ही कारवाई निर्भया पथकाच्या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सोनेत, महिला पोलिस शिपाई सानप, ठोकरे, जमादार, लाड यांनी केली. पालक तसेच शिक्षक आणि शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध ठिकाणी मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारच्या होणाऱ्या त्रासाची व टवाळखोरांची माहिती निर्भया पथकाला तसेच डायल ११२ यंत्रणेला द्यावी, असे आवाहन निर्भया पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक सोनेत यांनी केले.
—————
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis
