जळगाव, 17 फेब्रुवारी (हिं.स.) सध्या सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अवघ्या काही मिनिटांत मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये मोठी घसरण नोंदवली गेल्याने गुंतवणूकदारांसह सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष वेधले गेले आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच दरात घसरण झाल्याने दागिने खरेदीसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी उच्चांक गाठणारी चांदी आता मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली असून, एका झटक्यात प्रति किलो हजारो रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. बाजार उघडताच दर घसरल्याने चांदीच्या दरांचा फुगा फुटल्याची चर्चा सुरू आहे. सोन्याच्याही किमतीत हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. अधूनमधून थोडीफार वाढ दिसत असली तरी एकूणच सोन्याचा कल घसरणीकडे आहे. उच्चांकावरून खाली आलेले सोन्याचे दर पाहता, गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही पुन्हा एकदा खरेदीकडे वळताना दिसत आहेत. आजच्या व्यवहारात सोन्याच्या दरात सुमारे ₹1,700 तर चांदीच्या दरात जवळपास ₹5,000 रुपयांची घसरण झाली आहे. दरातील या घसरणीमुळे जळगावसह राज्यभरातील सराफा बाजारात हालचाल वाढली असून, अनेक ग्राहकांनी खरेदीसाठी दुकानांची वाट धरली आहे. येत्या काळात दर आणखी घसरणार की पुन्हा वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर
