मालेगाव, 2 ऑगस्ट (हिं.स.)। मागील भांडणाची कुरापत काढून तिघा जणांनी मनपा कंत्राटी कर्मचारी नितीन उर्फ रितीक अर्जुन निकम (२५, रा. जयभीमनगर, आयशानगर) याच्यावर लाकडी दांडक्याने व चाकूने हल्ला करून तसेच चेहरा दगडाने ठेचून निघृणपणे खून केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१) मध्यरात्री जुना आग्रारोडवरील एका शोरूमजवळ घडला. हा खुनाचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी छावणी पोलिसांनी संशयीत आरोपी सचिन अहिरे उर्फ सच्या माया याला अवघ्या काही तासात अटक केली असून, अन्य दोन अल्पवयीन संशीयितांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी मयताचा भाऊ विशाल अर्जुन निकम यांनी फिर्याद दिली आहे.
विशालचा भाऊ नितीन याला सचिन अहिरे व अन्य अल्पवयीन संशीयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून लाकडी दांडक्याने मारहाण केली. धारदार चाकूने गंभीर वार केले. चेहऱ्यावर दगड टाकून जीवे ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या खुनाची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोऱ्यामाऱ्या सर्रासपणे होत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV
