मुंबई, २१ डिसेंबर (हिं.स.) : मालाड मालवणी परिसरातील अंबुजवाडी येथे शाळेचा वॉचमन मोहम्मद अन्सारी याने चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पालकांनी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी मोहम्मद अन्सारी विरोधात ३७६, ३५४, भादंवि कलमांतर्गत ४, ८, १२ पोस्को अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, १९ डिसेंबरच्या सकाळी ९ ते १२ वाजेदरम्यान ही घटना घडली. चार वर्षीय चिमुकली नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. आरोपी मोहम्मद अन्सारी संधी साधून अल्पवयीन मुलीला एका क्लासरूममध्ये घेऊन गेला आणि तिथे त्याने गैरकृत्य केले. घटनेनंतर त्रास होऊ लागल्याने मुलगी रडत होती. त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. तेव्हा तिच्या पालकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली. त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार
