नाशिक, २९ (हिं.स.) : थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविणारे आता शहर पोलिसांच्या रडारवर आहेत. अशाप्रकारे मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांविरोधात ड्रंक अॅण्ड ड्राईव्हनुसार दंडात्मक कारवाई करीत गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
त्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून आजपासून आयुक्तालय हद्दीमध्ये सुमारे ५० पेक्षा अधिक ठिकाणी नाकाबंदी करीत कारवाई केली जाणार आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांचे आत्तापासून पाट्यांचे नियोजन केले जात आहे. बहुतांशी पाट्यां या ओल्या अर्थात मद्यपानाच्याच असल्याने ३१ डिसेंबरच्या रात्री दरवर्षी वाहनांचे अपघात होत असतात. असे अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलीस ठाणे निहाय व वाहतूक शाखेच्या मदतीने आजपासून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
वाहतूक शाखेतर्फे आयुक्तालय हद्दीत ५० पेक्षा अधिक ठिकाणी नाकाबंदी करीत वाहनचालकांची ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची तपासणी केली जाणार आहे. मद्यपान करून वाहन चालविताना आढळून आल्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात संबंधित चालकाची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला जाणार आहे. वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी व मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी १० हजारांचा दंडही वसुल केला जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार
