पुणे, 7 सप्टेंबर (हिं.स.)पुण्यात ऐन गणेशोत्सवात टोळीयुद्धाचा भडका उडाला. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची हत्या करण्यात आलीय. आयुष कोमकर हा वनराज आंदेकर यांचा भाचाच होता. या प्रकरणी आता वनराज आंदेकरचे वडील बंडू आंदेकर याच्यासह इथरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरने स्वत:च्या नातवालाच संपवलं. टोळीयुद्धाची धग थेट कुटुंबातच पोहोचल्याचं यातून दिसून येतंय.
गोविंद उर्फ आयुष कोमकर याच्या हत्या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर, त्यांचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान आणि यश सिद्धेश्वर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या त्यांच्याच दोन बहिणींनी सुपारी देऊन घडवून आणली होती. या प्रकरणी संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि गणेश कोमकर हे सध्या तुरुंगात आहेत. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच आंदेकर टोळीने वनराज यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट रचला होता. पोलिसांनी आठवड्याभरापूर्वीच आंदेकर टोळीचा कट उधळून लावला होता. त्यावेळी टोळीने वेगळ्याच ठिकाणी रेकी केली होती. मात्र शुक्रवारी थेट नाना पेठेतच हा हल्ला झाल्याने पोलिसांनाही धक्का बसला.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
