मुंबई, 7 सप्टेंबर (हिं.स.)। ॲपलच्या तंत्रज्ञानप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. जगभरातील लक्ष वेधून घेणारा ॲपलचा वार्षिक कार्यक्रम यंदा ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक उत्सुकता आयफोन १७ सीरिजबाबत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वेळी ॲपल आपले नवे प्रॉडक्ट्स बाजारात सादर करणार असून मोबाईलपासून वॉचपर्यंत आणि एअरपॉड्सपर्यंत विविध श्रेणींतील उपकरणांचा समावेश असेल.
आयफोन १७ सीरिजमध्ये कंपनीकडून चार नवीन मॉडेल्स बाजारात आणले जाणार आहेत – आयफोन १७, आयफोन १७ एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स. यापैकी प्रो मॉडेल्स नव्या डिझाइनसह बाजारात दाखल होणार असून अल्ट्रा स्लिम एअर मॉडेल प्लस व्हर्जनची जागा घेईल. या सीरिजमधील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे २४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा. स्मार्टफोन सेगमेंटमधील फोटोग्राफी अनुभव आणखी उंचावण्याचे कंपनीचे प्रयत्न यातून दिसून येतात. कार्यक्रमानंतर साधारण आठवडाभरात आयओएस २६ चे स्थिर व्हर्जन ग्राहकांना उपलब्ध होईल अशीही शक्यता आहे.
यंदाच्या कार्यक्रमात ॲपलकडून स्मार्टवॉचची नवी आवृत्तीही बाजारात आणली जाणार आहे. ॲपल वॉच अल्ट्रा ३ ही दोन वर्षांनंतर मोठ्या अपग्रेडसह सादर केली जाईल. यामध्ये अधिक मोठा डिस्प्ले, एस११ प्रोसेसर, ५जी सपोर्ट तसेच सॅटेलाईट मेसेजिंगसारखे अत्याधुनिक फिचर्स असतील. ॲपल वॉच सिरीज ११ मध्ये फार मोठे बदल नसले तरी ब्राइटनेस लेव्हलमध्ये सुधारणा आणि नवीन कलर पॅलेट ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच किफायतशीर ॲपल वॉचएसईला सुधारित डिस्प्ले आणि वेगवान प्रोसेसरसह सादर करण्याची तयारी आहे.
ऑडिओ सेगमेंटमध्ये ॲपल एअरपॉड्स प्रो ३ घेऊन येत आहे. यामध्ये चार्जिंग केस अधिक कॉम्पॅक्ट डिझाइनमध्ये असेल, इअरबड्सच्या डिझाइनमध्ये सूक्ष्म बदल केले जातील. सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यात अपेक्षित असलेले ‘लाईव्ह ट्रान्सलेशन’ फिचर, ज्यामुळे भाषांतराचा अनुभव वापरकर्त्यांना रिअल टाइममध्ये मिळू शकतो.
एकूणच ९ सप्टेंबरचा ॲपल इव्हेंट तंत्रज्ञानाच्या दुनियेसाठी नवे मानदंड प्रस्थापित करणारा ठरण्याची शक्यता आहे. आयफोन १७ सीरिजपासून वॉच अल्ट्रा ३ आणि एअरपॉड्स प्रो ३ इत्यादी प्रोडक्टस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
