पुणे, 24 जानेवारी (हिं.स.)पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूरमध्ये गॅरेजचालकाकडून जप्त केलेल्या अंमली पदार्थाच्या विक्रीत प्रत्यक्ष पोलीस कर्मचाऱ्याचा हात असल्याची बाब समोर आली आहे. श्रीरामपुरातील एमआयडीसीत जप्त केलेला अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ या पोलिसाने चोरून परस्पर विक्री केल्याचे दिसते. शिरूरमधील गॅरेजचालक शादाब रियाज शेख ( ४१) याच्याकडून एक किलो ५२ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले.
फॉरेन्सिक तपासणीत हा पदार्थ झोपेच्या गोळ्या तयार करण्यासाठी वापरला जाणारा अल्प्राझोलम असल्याचे निष्पन्न झाले.चौकशीत शादाब शेखने अहिल्यानगरच्या अंमली पदार्थ विरोधी विभागातील पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजरसह अन्य तिघांची नावे घेतली. तांत्रिक तपासात गुजरचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्यासह चार आरोपींना अटक केली.
आरोपींकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील किमंतीनुसार १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा १० किलो ७०० ग्रॅम अल्प्राझोलम जप्त केला. मे २०२५ मध्ये श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात एका टेम्पोतून १३ कोटी ७५ लाखांचा अल्प्राझोलम जप्त केला होता. हाच मुद्देमाल गुजर याने पदाचा गैरवापर करून चोरल्याचे आता उघड झाले आहे.काही आरोपींनी हा अंमली पदार्थ घरातील गोठ्यात, तर काहींनी शेतात लपवून ठेवल्याचे उघड झाले.
पुणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे हा साठा हस्तगत केला. या प्रकरणी शादाब रियाज शेख (रा. शिरूर, पुणे),शामसुंदर गुजर (रा. अहिल्यानगर),ऋषिकेश प्रकाश चित्तर (रा. कुरुंद, ता. पारनेर),महेश गायकवाड (रा. श्रीगोंदा),ज्ञानदेव शिंदे (रा. अहिल्यानगर) यांना अटक केली असून, दुचाकी, कारसह इतर साहित्य जप्त केले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
