नाशिक (प्रतिनिधी) : शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मोटारसायकलचोरीचा पहिला प्रकार जुईनगर येथे घडला. फिर्यादी किरण कृष्णा पाचपुते (रा. मृगनयनी अपार्टमेंट, जुईनगर, दिंडोरी रोड, नाशिक) यांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये एमएच ४१ बीए ८७०६ या क्रमांकाची होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, तसेच एमएच १५ एफएल ५२७६ या क्रमांकाची २० हजार रुपये किमतीची होंडा डिलक्स अशा दोन मोटारसायकली पार्क केल्या होत्या. या मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जगताप करीत आहेत.
मोटारसायकलचोरीचा दुसरा प्रकार गोल्फ क्लब मैदानाजवळ घडला. फिर्यादी संकेत दीपक कुमावत (वय २३, रा. नाशिक) यांनी दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अनंत कान्हेरे मैदानाच्या नवीन गेटसमोर एमएच १५ एफए ६६६० या क्रमांकाची १५ हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची अॅक्टिव्हा मोपेड उभी केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक बहिरम करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
