सोलापूर 31 डिसेंबर ( हिं.स)राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सोलापूर शहर परिसरातील दोन धाब्यांवर टाकलेल्या धाडीत मा. न्यायालयाने दोन हॉटेल चालकासह पाच मद्यपी ग्राहकांना पासष्ट हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच विभागाने शहरात एका दुचाकीवरुन वाहतूक होणारी शंभर लिटर हातभट्टी दारुही जप्त केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरिक्षक कृष्णा सुळे यांच्या पथकाने सोलापूर-तुळजापूर रोडवरील शेळगी हद्दीतील होटेल तुळजाई या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक तानाजी भाऊराव जाधव, वय 68 वर्षे हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आल्याने त्याचेसह दोन मद्यपी ग्राहक नारायण धनराज उजलंबे व लक्ष्मण बाबूराव बनसोडे यांना अटक करण्यात आली. एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने वडाळा (ता. उत्तर सोलापूर) हद्दीतील होटेल साईराज या ठिकाणी छापा टाकून होटेल चालक महेंद्र भिमराव भगत, वय 32 वर्षे व तीन मद्यपी ग्राहक बबन केशव जाधव, सुशांत मल्लिकार्जुन फंड व श्रीकांत बिभिषण भिसे यांना अटक केली. दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिका-यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले. मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, दारुबंदी न्यायालय यांनी हॉटेल चालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा अशी शिक्षा सुनावली असता सर्व आरोपींनी दंडाची एकूण रक्कम पासष्ट हजार मा. न्यायालयात जमा केली.
हिंदुस्थान समाचार
