अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.) :अग्रीमच्या नावाखाली अडत कपात करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील बाजार समितीमधील फळ व भाजीपाला विभागातील तीन अडत्यांविरुद्ध गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी कोतवाली ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बाजार समितीचे साहाय्यक सचिव तथा फळ व भाजीपाला विभागप्रमुख प्रवीण कृष्णराव पवार (४८) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
विनोद मनोहर मांडळे, सुधाकर जयरामसा बनारसे व आशिष उर्फ पंकज हनुमंत जळीतकर अशी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या अडत्यांची नावे आहेत. दोन अडत्यांनी अग्रीमच्या नावाखाली अडत कपात करून फसवणूक केल्याची तक्रार येथील शेतकरी नितीन मोहोड यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली होती. त्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला दिले होते. त्यानुसार २३ सप्टेंबर रोजी चौकशी अहवालाची प्रत शहर कोतवाली पोलिसांना देण्यात आली. डते विनोद मांडळे व सुधाकर बनारसे यांनी नितीन मोहोड यांची १ हजार ३५० रुपयांनी फसवणूक केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला. तर आशिष जळीतकर या अडल्याने आपल्या पट्टीतून अग्रीमच्या नावाखाली ३४० रुपये अडत कपात केल्याची तक्रार अक्षय शिनगारे यांनी केली होती. ती तक्रारदेखील अहवालात योग्य ठरविण्यात आली. तिनही अडत्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले. त्या अहवालानुसार तिघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंदुस्थान समाचार
