रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) : येथील जयेश मंगल कार्यालयात तीन दिवसांचे भव्य ग्राहककेंद्रित गारवा प्रदर्शन सुरू आज झाले आहे. त्याचे उद्घाटन पार्लर असोसिएशन आणि उद्योजिका सौ. शुभांगी जयंत देसाई व आंबा बागायतदार जयंत रघुनाथ देसाई या मान्यवरांच्या हस्ते झाले.
रत्नागिरीच्या चोखंदळ ग्राहकांसाठी आपल्या आवडीच्या वस्तू हाताळून, पारखून मनपसंत खरेदीचा मनमुराद आनंद प्रदर्शनात घेता येणार आहे. हे प्रदर्शन सौ. अदिती देसाई, सौ. आरती पटवर्धन व सौ. तृप्ती लोध यांनी केले आहे. या प्रदर्शनामुळे स्टॉलधारकांना विक्रीसंदर्भात नवनवीन कल्पना मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे, असे त्यांनी सांगितले.प्रदर्शनात नेहमीच्या प्रॉडक्टव्यतिरिक्त काही हटके प्रॉडक्टसुद्धा आहेत. सिल्वर कॉटिंग आर्टिकल, हॅन्डमेड पर्सेस, हॅन्डमेड लाकडी खेळणी, ज्वेलरी इत्यादींचा त्यात समावेश असून लहान मुलांसाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तूचे स्टॉल आहेत. जिभेचे चोचले पुरवणारे, तृप्तीचा ढेकर देणारे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलसुद्धा आहेत.प्रदर्शनाच्या उद्या (दि. १३ जानेवारी) दुपारी १२ ते ३ या वेळेत खास छोट्या दोस्तांसाठी लिटिल चॅम्पस रॅम्प वॉक आयोजित केला आहे. चार ते १० या वयोगटातील मुले यात भाग घेऊ शकतात.
हिंदुस्थान समाचार
